सांगली- मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे हनुमान मंदिरात एका वानराचा मृत्यू झाला. मारुतीला दंडवत घालत मंदिराच्या गाभाऱ्यात वानराने आपले प्राण सोडल्याची घटना घडली असून हा सर्व प्रकार एका भक्ताच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
व्हिडिओ : सांगलीच्या गुंडेवाडीत मारुतीला दंडवत घालत वानराने सोडले प्राण - मिरज गुंडेवाडी मारुतीला दंडवत घालत वानराचा मृत्यू
मारुतीला दंडवत घालत मंदिराच्या गाभाऱ्यात वानराने आपले प्राण सोडल्याची घटना घडली असून हा सर्व प्रकार एका भक्ताच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
हनुमान हे वानराचे प्रतिक आणि रूप मानले जाते. त्यामुळे वानराला नमन केले जाते. अशाच एका वानराने थेट मारुतीच्या चरणी आपले प्राण सोडल्याची घटना मिरज तालुक्यातील गुंडेवाडी याठिकाणी घडली आहे. गुंडेवाडी येथे दक्षिणमुखी पुरातन मारुती मंदिर आहे. या मंदिरात सांगली, मिरज येथून भक्तगण प्रत्येक शनिवारी दर्शनासाठी येत असतात. शनिवारी मंदिरातील झाडावर एक वानरांचा कळप बसला होता. या कळपातील एक वानर अचानक मंदिरात शिरले. ते मंदिराच्या गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर येऊन बसले. सतत मंदिराच्या शेजारच्या झाडावर खेळणारे हे वानर आज साक्षात मारुतीरायाला नमस्कार करत होते. ही बातमी काही क्षणात गावात पसरली आणि पाहण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी झाली. यावेळी त्या वानराने मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि बराच वेळ वानर तिथेच बसले होते. काही वेळाने वानराने गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर मारुतीला दंडवत घालण्यास सुरुवात केली आणि दंडवत घालत-घालत वानराने आपले प्राण सोडले.
वानरावर विधीवत अंत्यसंस्कार
शनिवार हा हनुमानाचा दिवस आणि हनुमान मंदिरातच वानराने प्राण सोडल्याची बातमी गुंडेवाडीसह परिसरातील भाविकांना समजल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
त्यानंतर ग्रामस्थांनी टाळ-मृदंगाचा जयघोष करत मंदिराच्या शेजारी वानराचे अंत्यसंस्कार पार पाडले. वानराच्या अशा मृत्यूने अनेक भाविकांनी हळहळ व्यक्त केली.