सांगली- स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली लोकसभेची जागा मिळणार ही केवळ अफवा आहे. सांगली लोकसभा काँग्रेसच लढवणार, असा विश्वास काँग्रेस आमदार व सांगली जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसमध्ये निर्माण झालेला पेच अजून सुटला नाही. तर, सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जाणार, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे भाजपात सांगलीतील काँग्रेस नेते जाणार. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सांगली काँग्रेस जिल्हाध्यक्ष व आमदार मोहनराव कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगली काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेता किंवा दादा किंवा कदम घराणे भाजपात जाणार नाही, असे कदम यांनी म्हटले.