सांगली - मताधिक्याच्या बक्षीसाचे आमिष दाखवल्या प्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार दरम्यान अधिक मताधिक्य देणाऱ्या आमदार, नेत्यांना ५ लाख रुपये बक्षिस देण्याचे जाहीर केले होते.
मताधिक्य बक्षिसाची ऑफर भाजप जिल्हाध्यक्षांच्या अंगलट; पृथ्वीराज देशमुखांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल - POLICE
आपआपल्या मतदार संघात जे आमदार आणि नेते संजय पाटील यांना अधिक मताधिक्य देतील त्यांना ५ लाख रुपये बक्षिस देण्याची थेट ऑफर पृथ्वीराज देशमुखांनी दिली होती.
सांगली भाजप उमेदवार संजय पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या प्रचार दरम्यान मिरजेत सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत भाजप सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी संजय पाटील यांना अधिक मतदान देण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर देशमुखांनी आपआपल्या मतदार संघात जे आमदार आणि नेते पाटील यांना अधिक मताधिक्य देतील त्यांना ५ लाख रुपये बक्षिस देण्याची थेट ऑफर दिली. याची निवडणूक आचारसंहिता विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली. परिणामी मतदारांना आमिष दाखवल्याचा ठपका ठेवत देशमुखांवर मिरज पोलीस ठाण्यात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुखांची ही ऑफर त्यांच्याच अंगलट आल्याचे दिसत आहे.