सांगली- लोकसभेच्या बहुचर्चीत माढा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी तयार झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून फसवणूक झाल्याची भावना येथील जनतेमधून व्यक्त केली जात आहे. मागील लोकसभेवेळी या मतदारसंघात बोगस मतदान झाल्याची माहिती येथील नागरिकांनी आपणास दिली असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे.
माढा मतदार संघातील जनरेटा पाहता मी या मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह होत आहे. मात्र, मी मालक नसून पक्ष जो आदेश देईल तो मान्य असेल, असे स्पष्टीकरण मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहे. ते आज सांगलीमध्ये बोलत होते.
सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेतून देण्यात येणाऱ्या कृषी यंत्र व अवजारांचे आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात वितरण समारंभ पार पडला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुभाष देशमुख यांनी संवाद साधला.
मंत्री देशमुख म्हणाले, सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे आपण क्लस्टर प्रमुख आहोत. त्यानिमित्ताने या भागात दौऱ्यादरम्यान अनेक नागरिक पदाधिकारी आपल्याला भेटले होते. त्यावेळी माढा मतदार संघाचे शांघाय करण्याची घोषणा म्हणजे केवळ फसवणूक होती. तसेच या मतदारसंघाचा उमेदवार देशाचा पंतप्रधान होईल या भावनेतून आपण शरद पवारांना साथ दिल्याचे सांगत लोकसभेच्या निवडणुकीवेळी बोगस मतदान केल्याचे नागरिक आपणास सांगितले असल्याची माहिती मंत्री देशमुख यांनी यावेळी दिली.
माढा या मतदारसंघातून लोकसभा लढण्याबाबत कार्यकर्ते आणि नागरिकांमधून आपणास आग्रह होत आहे. मात्र भाजप पक्षाकडून जो आदेश येईल तो आपण मान्य करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.