सांगली -राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. यामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा समावेश झाला आहे. विश्वजित कदम हे पलूस-कडेगाव मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आले आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते स्वर्गीय पतंगराव कदम यांचे ते सुपुत्र आहेत, तर कदम यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून झालेल्या समावेशामुळे सांगली जिह्यातील काँग्रेसला उभारी मिळणार आहे.
एक नजर विश्वजीत कदम यांच्या जीवन परिचयावर...
नाव - डॉ. विश्वजीत पतंगराव कदम, जन्मतारीख - १३ जानेवारी १९८१, मतदारसंघ - कडेगाव-पलूस मतदारसंघ, विधानसभा सदस्य, महाराष्ट्र, शिक्षण - बीई (कॉम्प्युटर इंजिनिअरींग), एमबीए, हावर्ड विद्यापीठमधून पीएचडी
राजकीय कारकीर्द - डॉ. विश्वजीत पतंगराव कदम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत. ते काँग्रेस पक्षामधील सध्या तरुण फळीतील आमदार आहेत. दुष्काळग्रस्तांचे प्रश्न समजून घेण्यासाठी २०१३ साली युवक काँगेसचे प्रदेशाध्यक्ष असताना कदम यांनी ५२० किमीची पायी 'संवाद पदयात्रा' काढली होती. याच 'संवाद पदयात्रे'नंतर विश्वजीत यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर युवकांची मोठी फळी निर्माण केली.