महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रातील स्थिती तालिबानपेक्षा वेगळी नाही - आमदार खोत - सांगली जिल्हा बातमी

ज्याप्रकारे अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ठिकठिकाणी चौक्या उभ्या केल्या आहेत, त्याप्रमाणेच बैलगाडी शर्यत रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी चौक्या उभ्या केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थिती तालिबानपेक्षा वेगळी नाही, अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत

By

Published : Aug 19, 2021, 8:09 PM IST

Updated : Aug 19, 2021, 8:19 PM IST

सांगली -तालिबान सारख्या चौक्या उभ्या करून बैलगाडी शर्यती पोलीस बळावर चिरडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. झरे (ता. आटपाडी) या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या छकडागाडी (बैलगाडी) शर्यतीला जाताना पोलिसांकडून रोखण्यात आले. मात्र, पोलिसांची नाकेबंदी झुगारून खोत हे झरे याठिकाणी पोहोचले.

आमदार सदाभाऊ खोत

सदाभाऊंना पोलिसांनी रोखले

आटपाडीच्या झरे या ठिकाणी शुक्रवार (20 ऑगस्ट) भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीच्या मुद्द्यावरून जोरदार संघर्ष प्रशासन व पडळकर यांच्यात निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून झरेच्या आसपास 9 गावात संचारबंदी लागू केली आहे. तर झरेकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदीचा फटका आमदार सदाभाऊ खोत यांनाही बसला. पोलीस प्रशासनाकडून त्यांना झरे या ठिकाणी जात असताना रोखून प्रवेश नाकारण्यात आला. मात्र, त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारण्याची भूमिका घेतल्याने अखेर पोलिसांकडून त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर खोत यांनी झरे या ठिकाणी दाखल होत प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

फौजफाटा पेक्षा चर्चा करायला हवी होती

यावेळी आमदार खोत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयामध्ये बैलगाडीधारकांची बाजू राज्य सरकारकडून मांडली गेली पाहिजे होती, ती मांडली गेली नाही. उद्या झरे या ठिकाणी बैलगाडी शर्यती पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस फौजफाटा लावण्यापेक्षा चर्चा करायला हवी होती. बैलगाडा ओढायला बंदी नाही, असे असेल साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करण्यास बैल कसे, चालतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याचा अर्थ तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापर करणार असाल, तर शेतकरी तुमचा गुलाम आहे, या मानसिकतेत राहणार असेल, तर हे योग्य नाही, असे आमदार खोत म्हणाले.

महाराष्ट्रात तालिबान सारखी स्थिती

आमदार खोत म्हणाले, चार दिवसांपासून आपण ऐकत होतो अफगाणिस्तानात तालिबानी चौक्या ताब्यात घेत आहेत, चौक्या उभ्या करत आहेत आणि आता महाराष्ट्रातील स्थिती तालिबानीपेक्षा वेगळी दिसली नाही. जागो-जागी चौक्या उभ्या आहेत, लोकांना सोडले जात नाही.

सत्तेत येण्यापूर्वी बैलगाडी शर्यतीसाठी रस्त्यावर उतरू म्हणणारे शेतकऱ्यांचा प्रश्न कसा चिरडू शकता

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सत्ते येण्यापूर्वी बैलगाडी शर्यतीच्या परवानीसाठी रस्त्यावर उतरू, असे बोलले होते. आजा जनता या मागणीसाठी रस्त्यावर उतरली असताना पोलिसांच्या बळावर शेतकऱ्यांचा प्रश्न कसा चिरडून शकता, असा सवाल आमदार खोत यांनी उपस्थित केला.

काय आहे प्रकरण..?

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीवरून वातावरण तापले आहे. सांगली जिल्ह्यातील मोठा पोलीस फौजफाटा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या झरे (ता. आटपाडी) या गावी तळ ठोकून आहे. नऊ गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आमदार पडळकर यांनी शर्यतीसाठी तयार केलेले मैदान पोलिसांनी जेसीबी लावून उकरून टाकले आहे. शिवाय, कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत होऊ देणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. तर ठरलेल्या दिवशी (20 ऑगस्ट) बैलगाडी शर्यत होणारच, अशी ठाम भूमिका आमदार पडळकर यांनी घेतली आहे. त्यामुळे आता शुक्रवारी बैलगाड्यांच्या शर्यती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा -पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का ?; सत्तेची हौस कोणत्या जन्मात फिटणार?, सदाभाऊ खोतांची टीका

Last Updated : Aug 19, 2021, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details