सांगली - कोणत्याही परिस्थितीत चार वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण आम्हीच करणार, असा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्मारकाच्या परिसरामध्ये संचारबंदी लागू करत प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र तरीही गनिमी काव्याने आजचं उद्घाटन होणार, अशी गर्जना आमदार पडळकर यांनी करत प्रशासनाला आव्हान दिले आहे. त्याचबरोबर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दबावाखाली प्रशासन बेकायदेशीर वागत असल्याचा आरोपही आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली मध्ये बोलताना केला आहे.
स्मारक उद्घाटनाचा वाद टोकाला -सांगली शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादीकडून 3 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा जाहीर करण्यात आला आहे. तर भाजपाने याला विरोध करत27 मार्च रविवारी उद्घाटन होणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरामध्ये संचारबंदी लागू करत प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळपासून परिसर सील करत स्मारककडे जाणारे सर्व मार्ग बंद करून नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच स्मारक परिसरात प्रसारमाध्यमांना देखील जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.