सांगली- येथील मिरजेत 'मियावाकी देशी वनराई' हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन या उद्देशाने शहरात एक छोटेसे जंगल उभे करण्याचा हा प्रकल्प असून सांगली महापालिकेच्या वतीने ही वनराई साकारण्यात आली आहे.
मिरजेत उभं राहतयं 'मियावाकी देशी वनराई' प्रकल्प आजच्या सिमेंटच्या जंगलात हरवत चाललेल्या शहरांना वनराईने समृद्ध बनवण्याचा, जपानचे प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांचा प्रकल्प सांगली जिल्ह्यातील मिरजेत राबवण्यात आला आहे. सांगली महापालिका प्रशासन आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. मियावाकी पध्दतीने 'देशी वनराई' पालिकेच्या मोकळ्या जागेत साकारण्यात आली आहे. अवघ्या साडे पाच गुंठे क्षेत्रात तब्बल पंधराशेहून अधिक देशी प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात असून याला 'अटल आनंदवन घनवन प्रकल्प', असे नाव देण्यात आले आहे.
मिरज शहरातील महापालिकेच्या झारी बाग येथे असणाऱ्या एका दहा गुंठ्याच्या मोकळ्या भूखंडावर ही वनराई उभी करण्यात आली आहे. ज्यामध्ये साडे पाच गुंठे क्षेत्रात 55 प्रजातीची सुमारे पंधराशे पन्नास रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. ज्यात फुलांच्या झाडांचा अधिक समावेश आहे. या झाडांचे संगोपन करण्याची जवाबदारी ही नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी या सामजिक संस्थेवर आहे. मियावाकी पध्दतीने अगदी जवळ जवळ या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या पद्धतीमुळे कमी कालावधीत झाडांची वाढ होते. तर या झाडांच्या वाढीसाठी जीवामृत, कोकोपिट, शेणखत अशा फक्त सेंद्रिय खातांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे अवघ्या 2 वर्षांत 10 ते 12 फुटांची झाडांची वाढ होते. या ठिकाणी नागरिकांना स्वच्छ हवा घेता येणार आहे. त्यासाठी येथे ट्रॅकची निर्मितीही करण्यात येत आहे.
पर्यावरण, वृक्ष संवर्धन व 33 कोटी वृक्ष लागवड या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या यशानंतर पालिकेच्या बफर झोन, नाले, ओढे आणि मोकळ्या जागेत अशाच पद्धतीने वनराईचा प्रकल्प साकारण्यात येईल, असा मानस असल्याचे पालिकेच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.
हेही वाचा -पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेचे 'शंखध्वनी' आंदोलन