सांगली- मिरज-म्हैसाळ रस्त्यावरील विजयनगर येथे सापळा रचून तब्बल सव्वा दोन लाखांच्या विदेशी दारूसह 7 लाखांचा मुद्देमाल मिरज ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. मागील 24 तासांतील अवैद्य दारू तस्करीची ही दुसरी मोठी कारवाई मिरज तालुक्यात झाली आहे. या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गोव्यातून चोरट्या मार्गाने मिरज तालुक्यातील मालगाव याठिकाणी ही गोवा बनावटीची विदेशी दारू वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
सव्वादोन लाखांचा विदेश दारूसाठा जप्त
मिरज-म्हैसाळ मार्गावरील विजयनगर या ठिकाणी मिरज ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून गोवा बनावटीचा विदेशी दारू साठा जप्त केली आहे. गोव्यातून चोरट्या मार्गाने ही गोवा बनावटीची विदेशी दारू तस्करी होणार असल्याची माहिती मिरज पोलीसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एका संशयित मोटारीचा पाठलाग करत वाहन पकडले असता, त्यामध्ये वेगवेगळ्या ब्रॅण्डची गोवा बनावटीची विदेशी दारू आढळून आली. 2 लाख 12 हजारांचा विदेशी दारुसाठा आणि चारचाकी मोटारसह सात लाख 17 हजारांचा मुद्देमाल मिरज ग्रामीण पोलिसांनी यावेळी जप्त केला. दरम्यान, या कारवाई वेळी गाडीतील तीन जण हे पसार झाले. मात्र, गाडी चालकाला पकडण्यात पोलिसांनी यश आले असून गोव्यातून ही दारू मिरज तालुक्यातील मालगाव या ठिकाणी घेऊन जाण्यात येत, असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती मिरजचे पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी दिली आहे.