सांगली -तब्बल 30 तास चाललेल्या मिरजेच्या गणेश विसर्जन मिरवणुकांची सांगता मिरज पोलिसांच्या गणेश मूर्तीने झाली. यावेळी चक्क अप्पर पोलीस अधीक्षकांनी बाप्पासमोर फुगडीचा फेर, तर पोलीस उपाधीक्षक यांनी पंजाबी ठेका धरला. मग पोलीस कर्मचाऱ्यांनीही सहभागी होत मोठ्या जल्लोषात गणरायाला निरोप दिला.
हेही वाचा - लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरजेत भक्तांचा महापूर
मिरजेच्या ऐतिहासिक गणपती विसर्जन मिरवणुकीची सांगता पोलिसांच्या गणेश विसर्जनाने होत असते. त्यामुळे मिरजेतील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन अंतिम टप्प्यात असताना मिरजेत पोलिसांच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डूबुल, मिरज पोलीस उपाधीक्षक संदीपसिंह गिल यांनी झिम्मा फुगडीचा फेरा धरला. तर यांनंतर पोलीस उपाधीक्षक संदीप सिंग यांनी पंजाबी तडक्यावर ठेका धरला आणि मग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही पारंपारिक वाद्याच्या गाण्याच्या तालावर ठेका धरत मनसोक्त थिरकले.