सांगली - मिरज तालुक्यातील बेडग येथे एका 12 वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करून तिचे अश्लील फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित मुलगी सहावीच्या इयत्तेत शिकते. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
सांगलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; एकाला अटक पीडित अल्पवयीन मुलगी येथील नातेवाईकांकडे राहायला आली होती. रात्रीच्या वेळी ही मुलगी जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात असणाऱ्या शौचालयात गेली. यावेळी आरोपी लक्ष्मण गेनू कारंडे (वय 25) या तरुणाने पीडितेचा पाठलाग केला; आणि शौचालयात तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी आरोपीने पीडितेचे मोबाईलमध्ये अश्लील फोटो देखील काढले.
बराच वेळ वेळ झाल्यानंतरही मुलगी घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी संबंधित तरुणाला पकडून मुलीची सुटका करण्यात आली. मिरज ग्रामीण पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली; आणि आरोपीला अटक करण्यात आली.
त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आज आरोपी लक्ष्मण कारंडे याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून पीडितेचे अश्लील फोटोदेखील जप्त केल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.