सांगली - सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला ठेवण्याची भाजपची निती आणि कट नेहमीच राहिला आहे, असा आरोप कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केला आहे. त्याचबरोबर राजकीय सुपारी घेऊन कोणी सरकारच्या विरोधात काम करू नये, असा इशाराही मंत्री कदम यांनी दिला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
माहिती देताना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम जनतेचे प्रश्न बाजूला ठेवण्याची भाजपची निती
मंत्री विश्वजित कदम म्हणाले, भाजपची निती शेतकरी आणि सर्वसामान्य,गोरगरीब जनतेचे प्रश्न बाजूला ठेवायचे आणि दर महिन्याला काहीतरी मुद्दा काढायचा आणि आठवडाभर त्याची मीडियाबाजी करत विरोधात प्रतिक्रिया देऊन लोकांचं लक्ष विचलित करायची हा कट राहिला आहे, मात्र भाजपच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे रस्त्यावर उतरून लढाई करतील, असे मत विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -'ड्रीम मॉल'च्या आगीसाठी राज्य सरकार जबाबदार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आरोप
राजकीय सुपारी कोणी घेऊ नये
तसेच पोलीस दल आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरू असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.अशी कोणतीही लढाई नाही पोलीस दल सरकारच्या बाजूने असून पोलिसांचाही सरकारला अभिमान आहे.आता काही अधिकाऱ्यांनी लोकशाहीच्या विरोधात कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन कृत्य करत असतील तर त्याची चौकशी झालीच पाहिजे, आणि कोणीही राजकीय सुपारी घेऊन सरकारच्या विरोधात काम करू नये,असा विनंती वजा इशारा विश्वजित कदम यांनी दिला.
वीज बिलाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय
राज्यातील वीज बिलांच्या बाबतीत बोलताना,कोरोना काळात राज्याला मोठी आर्थिक तूट सोसावी लागली आहे, अशा स्थितीत केंद्राकडून राज्याला 30 हजार कोटींची रक्कम येणे बाकी आहे, पण राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. तसेच वीज बिलांच्या बाबतीत उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहेत. पण येणाऱ्या काळात कोणावरही अन्याय होणार नाही,याबाबत आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन सकारात्मक निर्णय हा जनतेच्या हिताच्या दृष्टीने घेतला जाईल, असं सूचक वक्तव्य मंत्री कदम यांनी वीज बिलांबाबत केले आहे.
शेतकऱ्यांसाठी प्रसंगी कर्ज काढू
गेल्या वर्षापासून राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेला आहे. गेल्या आठ दिवसातही राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे, आणि शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना तसेच कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टीने पंचनामे ताबडतोब करून अहवाल आल्यानंतर मदत केली जाईल, गेल्या वर्षभरातील अवकाळी नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर करत ती मदत दिली आहे. यापुढेही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रसंगी सरकाराला कर्ज काढावे लागले तरी सरकार कर्ज काढेल आणि शेतकरी मदत करण्याची भूमिका घेईल, अशी ग्वाही मंत्री कदम यांनी दिली आहे.
हेही वाचा -ईटीव्ही विशेष: पोक्सो कायद्याचे महत्त्व; खरोखर गुन्हेगारांना बसली आहे का चपराक?