सांगली -राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. त्याचा फटका शेतीला बसत आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. ते सांगलीत बोलत होते.
मंत्री कदम यांनी कोरोनाची कृषी क्षेत्रालाही झळ बसल्याचा उल्लेख केला. 'कोरोना विषाणू संसर्गामुळे जगातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. भारतातसह आपल्या राज्यातही याचा परिणाम जाणवतो आहे. मात्र, तूर्त कोरोनाच्या परिस्थितीवर मात करणे हे ध्येय आहे. त्यानंतर नुकसानीच्या बाबतीत विचार होईल. त्यामुळे यावर आता भाष्य करणं योग्य होणार नाही. ही संपूर्ण परिस्थिती निवळल्यानंतर याबाबतीत बोलणं योग्य होईल,' असेही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले आहे.