सांगली- धनगर समाजाच्या सवलतीचे आकडे, केवळ निवडणूक घोषणे पुरता केले जातात,असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर केला आहे. तसेच टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल हा केवळ वेळ काढूपणा ठरला आहे, त्याच्या निष्कर्षानुसार धनगर समाजास आरक्षण मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. तो प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असे मतही मंत्री पाटील यांनी व्यक्त केले आहे. इस्लामपूर येथे महाराष्ट्र राज्य धनगर महासंघाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभा प्रसंगी ते बोलत होते.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा भाजपावर निशाणा.. धनगर समाजाला आरक्षण, सवलती द्या..महाराष्ट्र धनगर महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे पुत्र व इस्लामपुरचे माजी नगराध्यक्ष चिमण डांगे यांची निवड झाली आहे. या निवडी बद्दल धनगर महासंघाच्यावतीने इस्लामपूर मध्ये जलसंपदामंत्री यांच्याहस्ते चिमण डांगे यांचा जाहीर सत्कार पार पडला. या सत्कार समारंभासाठी सार्वजनिक बांधकाम व वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार रामहरी रुपनवर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी धनगर समाजाच्या नेत्यांनी आपल्या भाषणात धनगर समाजाला आरक्षण व सवलती मिळाव्यात अशी आग्रही मागणी केली.
धनगर आरक्षणावरून भाजपावर निशाणा..या समारंभ प्रसंगी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील बोलताना म्हणाले, गेली कित्येक वर्षे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा भिजत घोंगडे आहे. मला कोणत्या पक्षावर टीका करायची नाही, पण धनगर समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीने टाटा इन्स्टिट्यूटकडून धनगर समाजाच्या सद्य स्थिती आणि आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास बराच काळ करण्यात आला आणि त्याचा अहवाल मागच्या सरकारच्या काळात आला, पण तो त्यावेळी बाहेर आला नाही. आम्ही त्याची माहिती घेतली असता, त्याचा उपयोग समाजाच्या निर्णयासाठी होणार नाही. त्यांनी जे निष्कर्ष काढले त्यानुसार धनगर समाजाच्या आरक्षण मिळेल, अशी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे टाटा इन्स्टिट्यूटकडे जवाबदारी देणे, आरक्षणाच्या मुद्यावर वेळकाढू पणा करणे आणि संपूर्ण समाजाला अडचणीत आणणे, भाजपचे हे प्रकार आपल्याला हाणून पाडावे लागतील, असे मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केले आहे.
सवलतीच्या कार्यक्रमात सुधारणा करणार..भाजपावर निशाणा साधताना जयंत पाटील म्हणाले, मागे धनगर समाजासाठी 1 हजार कोटी रुपयांची घोषणा झाली. मात्र, ती निवडणुकीची घोषणा होती. त्यामुळे आपण त्यांना दोष देणार नाही. त्यातील किती कोटी खर्च झाले हे माहिती नाही, पण अशा ज्या घोषणा ठरलेल्या असतील, तो जो कार्यक्रम आहे, त्यात धनगर समाजासाठी सुधारणा करू, त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बसून आगामी अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब दिसेल, अशी व्यवस्था करू, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.