सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. तसेच नेहमी भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरेंनी आत्मचिंतन करावे, असा खोचक सल्ला मंत्री पाटील यांनी राज ठाकरेंना दिला आहे,ते मिरजेत बोलत होते.
काँग्रेसकडूनचं राष्ट्रवादीच्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसला गेलाय वैद्यकीय महाविद्यालय पदवी प्रदान सोहळा -मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा पदवी प्रदान समारंभ शुक्रवारी राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. मिरज या ठिकाणी पार पडलेल्या समारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेस आणि मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेसकडूनचं अनेक वेळा खंजीर खुपसला गेलाय - मंत्री पाटील म्हणाले, काँग्रेसकडून राष्ट्रवादीने खंजीर खुपसल्याचा आरोप केल्यानंतर आपण भंडारा याठिकाणी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी बोललो.2010 साली ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 सदस्य निवडून आलेले असताना काँग्रेसने भाजपाशी हातमिळवणी करत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून बाहेर ठेवलं. 2015 मध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादीचे 20 सदस्य निवडून आले होते. त्यापैकी सोळा काँग्रेसचे होते आणि त्यावेळी देखील काँग्रेसने भाजपाशी हातमिळवणी करत राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले. यामध्ये एकदम विराम अग्रवाल यांनी काँग्रेसला राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी पुढाकार घेतला तर दुसऱ्या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्र शेखर ठवरे यांना अध्यक्ष करून राष्ट्रवादीला बाजूला ठेवून भाजपाची मदत घेतली. हे सर्व करत असताना सर्व गोष्टी काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांच्या कानावर आमच्या वरिष्ट नेत्यांनी घातल्या होत्या, मात्र काही फरक पडला नाही. भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने युती करून काँग्रेस अध्यक्ष केला नंतर सभापतींच्या निवडीमध्ये मात्र काँग्रेसने दुर्लक्ष करून राष्ट्रवादीची फसगत केली. 2015 मध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याठिकाणी भाजपाचे परिणय फुके निवडून आले,त्या वेळी काँग्रेसने उघडपणे भारतीय जनता पार्टीला साथ दिली. बरोबर गोंदिया आणि भंडारा या ठिकाणी ग्रामपंचायत असतील जिल्हा परिषद असतील या निवडणुकांमध्येही काँग्रेसने भाजपला साथ दिली आहे. ठरलं होतं त्याप्रमाणे त्याचा कोणताही पालन कॉंग्रेसकडून झाले नाही,त्यामुळे काँग्रेसने किती वेळा खंजीर खुपसला,ही त्याची यादी आहे,अशा शब्दात जयंत पाटील यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे.
राज ठाकरेंनी आत्मचिंतन करावे -मंत्री पाटील, राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत बोलताना म्हणाले,राज ठाकरे यांनी अनेक वेळा आपली भूमिका बदलली आहे,काही कालांतराने त्याला वेगवेगळ्या बाह्य कारणे असतात, पण ते भूमिका बदलतात हे आता महाराष्ट्राच्या लक्षात आलय. त्यामुळे राज ठाकरे जे करतात ते लोक फारसे गांभीर्याने घेत नाही, त्यांच्या सभांना गर्दी होते,कारण ते चांगल्या नकला करतात,त्या नकला बघायला गर्दी होती.मात्र लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत, म्हणून राज ठाकरेंनी देखील आता आत्मचिंतन करावे,असा खोचक सल्ला मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना यावेळी दिला आहे.