सांगली - वाढता कोरोना संसर्ग पाहता सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे. तसेच सोमवारपासून गर्दीवर पोलिसांच्या माध्यमातून कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. सांगलीमध्ये आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.
मंत्री जयंत पाटील माहिती देताना सांगली जिल्ह्यात कोरोना आता समूह संसर्गामध्ये पसरला आहे. झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून 11 सप्टेंबरपासून 'जनता कर्फ्यू' पुकारण्यात आला आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी याला विरोध दर्शवला, तर नागरिकांनी याला फारसा प्रतिसाद दिला नाही, प्रशासनाने पुकारलेला जनता कर्फ्यू निष्फळ ठरला आहे. तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात आणि विशेषतः महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा दर ही वाढत आहे.
हेही वाचा -समस्त मुस्लिम समाजाकडून उभारण्यात येतोय कोरोना रुग्णालय, सर्व धर्मियांना मिळणार उपचार
या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये व्यापारी, विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांची बैठक घेऊन चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. व्यापाऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. जनता कर्फ्यू असतानादेखील मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे, मत अनेकांनी यावेळी नोंदवले. सर्व बाबी लक्षात घेऊन जयंत पाटील यांनी जनता कर्फ्यूमध्ये होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीवर कारवाई करण्याच्या बाबतीतला निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -वाचन चळवळीकडून ऑक्सिजनसाठी मदतीचा हात; गरजू रुग्णाला मोफत मिळणार प्राणवायू
सोमवारपासून सांगली महापालिका क्षेत्रात सहा जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर, त्याचबरोबर भरण्यात येणाऱ्या बाजारांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने सांगली पोलिसांना सूचना दिल्या आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी होताना दिसली नाही, तर पुढचा टप्पा नाईलाजाने लॉकडाऊन करण्याचा राहील, असा इशारा देत जनतेने बाजारात व इतर ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन मंत्री पाटील यांनी सांगलीच्या जनतेला केले.