मंत्री बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर.. वीज बिल, एसटी आंदोलनावरून ठाकरे सरकार इशारा - एसटी कर्मचारी संप
वीज बिल माफ केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात प्रसंगी प्रहार संघटनाही उतरेल, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आघाडी सरकारला दिला आहे.
सांगली -राज्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर विद्युत विभाग बसलयं, मात्र वीज बिल माफ केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात प्रसंगी प्रहार संघटनाही उतरेल, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आघाडी सरकारला दिला आहे. तसेच एक डिसेंबरपासून महाराष्ट्रात पहिली ते चौथी वर्गाच्या शाळा सुरू होतील, असा विश्वासही मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर..
सांगलीच्या इस्लामपूर या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीने कृषी क्रांती प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन कामगार व महिला बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते झाले. शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या दृष्टीने आयोजित या प्रदर्शनामध्ये 100 हून अधिक स्टॉल सहभागी आहेत. या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील शिक्षण धोरणावरून बोलताना शिक्षणाविषयी कायद्यात बदल करणे गरजेचे आहे. कायदा कुचकामी स्वरूपाचा आहे. कायदा पालकांच्या बाजूचा नसून, तो संस्था चालकांच्या बाजूचा आहे. शिक्षण कायद्यात बदल करण्याबाबत आम्ही पाठपुरावा करत आहोत, असे स्पष्ट केले आहे.