सांगली -जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नदीच्या महापूराच्या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगलीतील पूर परिस्थितीची पाहणी केली आहे. प्राथमिक स्तरावर नागरिकांचे स्थलांतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची योग्य ती काळजी घेण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री कदम यांनी दिली आहे. तसेच पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर जे काही नुकसान आहे, त्याबाबत मदत करण्यासाठी शासन नक्कीच प्रयत्नशील असेल असेही विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांचे स्थलांतर आणि आरोग्याची प्रथम काळजी -
सांगली शहरात महापुराचे पाणी शिरले आहे. शहरातल्या टिळक चौक, मारुती चौक, शिवाजी मंडळी, तसेच पुर पट्ट्यात पुराचे शिरले आहे. या पूर परिस्थितीची कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पाहणी केली आहे. यावेळी प्रशासनाकडून नागरिकांच्या स्थलांतर बाबतीत माहिती घेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतर करण्यात येत असलेल्या नागरिकांची तपासणी आणि योग्य ती आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना मंत्री विश्वजीत कदम यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचबरोबर राज्य सरकार या महापूर परिस्थितीशी सामना करताना नागरिकांच्या पाठीशी आहे आणि पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर शेती असेल किंवा अन्य नुकसान असेल त्याबाबत योग्य ती मदत करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असेल, असे मंत्री विश्वजीत कदम यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.