सांगली -केंद्र सरकारची भुमिका राज्याचे पालक अशी असते. मात्र, केंद्र सरकार जर राज्याला मदत देताना नकारघंटा वाजवणार असेल. तर, महाराष्ट्रातील सरकार काही लेचे-पेचे नाही. ते दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.
महाराष्ट्राचे सरकार लेचे-पेचे नाही. त्यामुळे मदतसाठी दुजाभाव करणाऱ्या दिल्लीसमोर ते झुकणार नाही, असा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिला आहे. तसेच देशाची अर्थव्यवस्था कोमात गेली असून आधीचेच सरकार बरे होते,अशी टीकाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
हेही वाचा... भारताचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे निधन
सांगलीच्या इस्लामपूर येथे वाळवा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळी नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह इतर अनेक मान्यवर मंडळी व इस्लामपूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे 14 कोटी रुपये खर्चून या नव्या इमारतीचे निर्माण करण्यात आले आहे. या सोहळ्याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, जनतेच्या विकासाला आणि त्यांना आधार देण्यासाठी वाळवा तहसील कार्यालय कार्यरत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.