सांगली - जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थिमुळे ज्या प्रमाणे जनजीवन विस्कळीत झाले, अगदी त्याच प्रमाणे जनावरांना देखील मोठा फटका बसला आहे. या जनावरांच्या तपासणीसाठी लातूरवरुन पशुवैद्यकीय आधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, या वैद्यकीय अधिकाऱ्याचा हृदयाविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. नारायण खरोलकर असे मृत डॉक्टरांचे नाव आहे.
सांगलीत पूरग्रस्त जनावरांसाठी सेवा बजावणाऱ्या लातूरच्या डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू - पशुवैद्यकीय आधिकाऱ्याचा हृदयाविकाराच्या धक्क्याने मृत्यू
जिल्ह्यातील पूरग्रस्त जनावरांची तपासणी करण्यासाठी आलेल्या लातूर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा हृदयाविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मागील आठ दिवसांपासून ते जिल्ह्यातील अनेक भागात जनावरांची तपासणी करत होते.
जिल्ह्यात आलेल्या महापुरानंतर राज्य सरकारने राज्यभरातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूरस्थितीत मदत करण्यासाठी पाचारण केले आहे. दरम्यान, महापुरात जिल्ह्यात मोठ्या संख्येत पशुधन दगावले. तर हजारो जनावरांची प्रकृती खालावली आहे. यावर उपाय म्हणून, विविध जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगली जिल्ह्यात पाचारण करण्यात आले आहे. यासाठी 14 ऑगस्टला डॉक्टर नारायण खरोलकर सांगलीमध्ये दाखल झाले होते. यानंतर ते जिल्ह्यातील अनेक भागात जाऊन पूरग्रस्त जनावरांची तपासणी करत होते. दरम्यान, शनिवारी रात्री जनावरांची तपासणी करुन ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि रविवारी सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले. पहाटेच्या दरम्यान, झोपेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.