सांगली - परीक्षा घ्याल तर, राज्यातील एमपीएससी परीक्षा केंद्रे उद्ध्वस्त करू, असा इशारा सांगलीच्या मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. तसेच, गनिमी काव्याने परीक्षा उधळून लावण्याचा निर्णय घेत एमपीएससी परीक्षा घ्याल तर, गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही राज्य सरकारला देण्यात आला आहे. सांगलीत आज मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हास्तरीय बैठकीत आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा -हाथरस अत्याचार: सांगलीत बहुजन मुक्ती मोर्चाचे धरणे आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वेगवेगळ्या पातळ्यांवर आंदोलन करण्यात येत आहे. सध्या एमपीएससी परीक्षा रद्द करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. मात्र, राज्य सरकारकडून या परीक्षा रद्द करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 11 ऑक्टोबरला परीक्षा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज सांगलीमध्ये जिल्हास्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एमपीएससी परीक्षेच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या मागण्यांकडे सकारात्मक पद्धतीने बघावे आणि आरक्षण जाहीर होण्यापूर्वी कोणत्याही परीक्षा घेऊ नयेत. सरकारने या परीक्षा घेण्याचा प्रयत्न केल्यास राज्यातील एमपीएससी परीक्षा केंद्रे उद्ध्वस्त करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सांगलीमध्ये देण्यात आला आहे. तसेच, सरकारने या परीक्षा रद्द कराव्यात. अन्यथा त्याची गंभीर किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशाराही यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा -घरात मानसिक त्रास, बाहेर चोरट्यांचा हल्ला; राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट