सांगली- लॉकडॉऊनचा फटका बसलेल्या मंडप, लाईट आणि डेकोरेटर्स व्यावसायिकांनी आज विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरु केले आहे. त्याप्रमाणे सांगलीमध्ये देखील जिल्ह्यातील मंडप व्यावसायिकांनी धरणे आंदोलन केले. कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मंडप व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या देश हळूहळू अनलॉक होत आहे. मात्र, मंडप व्यावसायिकांना अद्याप व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे धरणे आंदोलन करत व्यावसायिकांना नुकसान भरपाई देण्यात, यावी यासह लग्नसमारंभासाठी माणसांची उपस्थिती मर्यादा वाढवण्यात यावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
रोहित आर आर पाटलांचा पाठिंबा-
शहरातल्या स्टेशन चौक या ठिकाणी जिल्ह्यातील मंडप, लाईट आणि डेकोरेशन व्यावसायिकांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे युवक नेते रोहित आरआर पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन व्यवसायिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत राज्य शासन त्यांच्या पाठीशी असून संकटात सापडलेल्या या व्यवसायिकांना शासना नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन रोहित पाटील यांनी यावेळी दिले आहे.