सांगली - माझ्या जामीनदाराला नोटीसा का पाठवल्या, असा जाब विचारत इस्लामपूर येथील ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मॅनेजर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत खुर्च्यांची मोडतोड केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संदीप भीमराव गायकवाड (रा. येलूर) याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मॅनेजर पांडूरंग शंकरराव चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
कर्जाची नोटीस बजावल्याने कर्जदाराची मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल - सांगलीत कर्जदाराची कोऑपरेटिव्ह सोसायटीत तोडफोड बातमी
इस्लामपूर येथील ज्ञानदीप को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीने एका कर्जदाराने कर्जाचे हप्ते न भरल्याने कर्जाची नोटीस काढली होती. याबाबत सदर कर्जदाराने नोटीस का काढली म्हणत सोसायटीतील मॅनेजर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली तसेच खुर्च्यांची मोडतोडही केली. याप्रकरणी सोसायटीच्या मॅनेजर यांच्या फिर्यादीवरुन सदर कर्जदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
![कर्जाची नोटीस बजावल्याने कर्जदाराची मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल कर्जाची नोटीस बजावल्याने कर्जदाराची मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-04:53:09:1592738589-mh-sng-01-jivemarnyachidhmkivis-01-10055mh-sng-01-craimvis-02-10055-20062020214754-2006f-1592669874-203.jpg)
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपूर येथील ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून संदीप गायकवाड याने कर्ज घेतले होते. त्याने कर्जाचे सहा हप्ते भरले होते. मात्र, पुढील हप्ते न भरल्यामुळे त्याला व त्याच्या जामिनदारांना परस्पर नोटीस पाठविण्यात आली होती. दरम्यान २० जूनरोजी रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास संदीप गायकवाड हा हातात लाकडी दांडके घेवून ज्ञानदीप को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयात घुसला. तसेच, मॅनेजर पांडूरंग चव्हाण यांच्या केबीनमध्ये गेला व तु माझ्या कर्जासंदर्भात जामीनदार यांना नोटीस का पाठविल्या असे म्हणत ऑफीसमधील खुर्च्यांची मोडतोड केली. सोबतच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत मी आत्महत्या करणार आहे, असे म्हणू लागला. यावेळी लोकांची गर्दी झाल्याने गायकवाड याने तेथून पळ काढला. यानंतर मॅनेजर पांडूरंग चव्हाण यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी, इस्लामपूर पोलिसात गायकवाडविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.