महाराष्ट्र

maharashtra

'शेतकऱ्यांना सात-बारा घेऊन फिरण्याची गरज नाही, ऑनलाइन सात-बारा ग्राह्य ठरेल'

By

Published : Feb 15, 2020, 5:08 PM IST

सातबारा शेतकऱ्यांच्या हातात जरी नसला तरी शासकीय कामांमध्ये अडथळा येणार नाही. ऑनलाईन मिळणारा सात-बारा यापुढे ग्राह्य मानला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

सांगली - शेतकऱ्यांचा सात-बारा आता ऑनलाईन होणार असून त्यामुळे सातबाऱ्याअभावी शेतकऱ्यांची कोणतीही कामे थांबणार नसल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. सांगलीतील कडेगाव येथे ते बोलत होते.

यापुढे आता सातबारा शेतकऱ्यांच्या हातात जरी नसला तरी शासकीय कामांमध्ये अडथळा येणार नाही. ऑनलाईन मिळणारा सात-बारा यापुढे ग्राह्य मानला जाईल, अशी माहितीही थोरातांनी दिली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या 'गाव तिथे काँग्रेस अभियाना' अंतर्गत पलूस तालुक्यातील आमणापूर ग्राम काँग्रेस कमिटीच्या फलकाचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा -'देशाची सत्ता २ लोकांच्या हातात, परिवर्तन व्हावं ही तर लोकभावना'

शेतकऱ्यांना शासकीय कामात सात-बारा मिळवणे व तो सादर करणे, यामुळे अनेकदा मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते, तसेच शेतकऱ्यांना हेलपाटे सुद्धा मारावे लागतात. पण, लवकरच या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. राज्यातील सात-बारा ऑनलाईन प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. त्यामुळे सात-बारा ऑनलाईन होणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या शासकीय कामासाठी साता-बारा घेऊन जाणे गरजेचे राहणार नाही. संबंधित कार्यालयांमध्ये ऑनलाईन सात-बारा घेतला जाईल आणि तो ग्राह्य मानला जाईल. याबाबत लवकरच परिपत्रक काढण्यात येणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा -बंदोबस्तातील पोलिसांना 'ही' सुविधा पुरवली पाहिजे, शरद पवारांचे गृहमंत्र्यांना पत्र

तर शेतकरी वर्गाकडून देखील या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. मात्र, ऑनलाइन सात-बाराची प्रकिया करताना ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत, ज्या चुका झाल्या आहेत, त्या देखील दुरुस्त करून घ्याव्यात, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details