सांगली - कोरोना रुग्णालयाच्या भरमसाठ बिलांमुळे गोरगरीब रुग्ण आज आर्थिक संकटात सापडले आहेत. अशात सांगलीचे नमराह कोविड सेंटर गोरगरीब रुग्णांसाठी आर्थिक"संजीवनी" देणारे ठरले आहे. अवघे अडीच हजार रुपये प्रतिदिन ऑक्सिजन बेडसाठी आकारले जातात. त्यामुळे कोरोना परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रासाठी "नमराह" हे रोल मॉडेल ठरले आहे.
'नमराह' उपचाराबरोबर आर्थिक आधाराचे सेंटर
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून नमराह फाउंडेशन, सांगली महापालिका यांच्या माध्यमातून दहा ऑक्सिजन बेडचे रुग्णालय सुरू आहे. या ठिकाणी गोर-गरीब रुग्ण उपचार घेत आहेत. वास्तविक राज्य शासनाने ऑक्सिजन बेडसाठी 8 हजारच्या आसपास शासकीय दर निश्चित केले आहेत. मात्र, नमराह कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ प्रति दिवस 3 हजार 500 इतके बिल आकारले जाते, जे शासकीय दराच्या अर्ध्यापेक्षा कमी दर आहेत. लॉकडाऊनच्या परिस्थितीनंतर मध्यमवर्गीय कुटुंब अडचणीत आली आहेत. अशा स्थितीमध्ये जर कोरोनाची उपचाराची स्थिती निर्माण झाल्यास शासकीय दरसुद्धा गोरगरिबांना न पेलणारे आहेत. या जाणिवीतून नमराह फाउंडेशन व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर नमराह कोविड सेंटर सुरू केले.
"प्राणवायु दाता"मुळे आर्थिक भार आणखी कमी
नमराह फाऊंडेशनचे कार्यवाहक रहिमभाई मुल्ला म्हणाले, गेल्या वर्षी नमराह फाउंडेशनकडून केअर सेंटर सुरू करण्यात आलं होतं, आणि आता थेट कोरोना रुग्णांवर उपचार करणारा सेंटर सुरू केला आहे. अल्प दरात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी उत्तम उपचार सुरू आहेत. सध्या 10 ऑक्सिजनचे बेड आहेत. प्रत्येकी साडे तीन हजार रुपये प्रती दिवस इतका आपला अत्यंत कमी दर आहे. पण यामध्येही रुग्णांना अधिक सूट मिळून अधिकचा आर्थिक हातभार मिळावा, या उद्देशाने नमराह फाऊंडेशनच्या माध्यमातून व नगरसेवक संतोष पाटील यांच्या पुढाकारातून "प्राणवायू दाता"हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नमराह कोविड सेंटरमध्ये 10 बेडसाठी दररोज प्राणवायूसाठी दहा हजार रुपये इतका खर्च येतो आणि तो एखाद्या दानशुर, सामाजिक संस्था किंवा अन्य संघटनांकडून मिळाल्यास प्रत्येक रुग्णाच्या आर्थिक खर्चात मदत होऊ शकते आणि या हाकेला साद देत आता अनेक दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था नमराहच्या "प्राणवायू दाता"या उपक्रम व कार्याच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मिळणारी देणगी ही उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या खात्यात सामायिक पद्धतीने वर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णाला एक हजार रुपयांची आणखी सूट मिळत आहेत, असं रहीमभाई मुल्ला यांनी सांगितले.
हेही वाचा -शरद पवार यांचा सरकारला पूर्ण आशीर्वाद - संजय राऊत