सांगली -मागील पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कुरळप (ता. वाळवा) येथील अमोल सूर्यवंशी या शेतकऱ्याच्या 50 गुंठे क्षेत्रातील दोडका आणि टॉमॅटो पीक वाहून गेले. यामुळे दोन अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
50 गुंठ्यांतील दोडका, टॉमॅटो पीक अवकाळी पावसाने वाहून गेल्याने दोन लाखांचे नुकसान कोरोनाच्या महामारीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांची आर्थिक घडी बिघडली आहे. कोरोनाच्या सुरवातीला दोन महिने बाजारपेठा बंद असल्याने कित्येक शेतकऱ्यांना आपला भाजीपाला शेतातच कुजवावा लागला. त्याच्या लागवडीचा खर्चही अंगावर आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. बाजारपेठा सुरू झाल्या. मात्र, आठवडा बाजार बंद झाला. नंतर एका महिन्यापासून शेतकरी कसेबसे सावरत असताना आता अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.
हेही वाचा -सोलापूर महापूर भीषणता:14 जणांचा मृत्यू;570 गावे उद्धवस्त
वाळवा तालुक्यातील कुरळप येथील अमोल सूर्यवंशी यांच्या कुंडलवाडी रोडलगत असणाऱ्या 30 गुंठे क्षेत्रात दोडका व 20 गुंठ्यात टॉमॅटो पीक लावले होते. यासाठी त्यांना दोडका पिकासाठी ठिबक सिंचन, पाइप लाइन, मल्चिंग पेपर, लाकडी दांडकी, तारा यासाठी एक लाख रुपये आणि टॉमॅटो पिकासाठी पन्नास हजार रुपये खर्च आला. मागील दहा दिवसापासून दोडका पिकापासून उत्पन्न सुरू झाले होते. मात्र, बुधवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याचे पाणी शेतात शिरून ठिबक पाइप, दांडकी, मल्चिंग पेपरसह दोडका पीक वाहून गेल्याने दोन-अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. दोन-तीन महिने महागडी औषध व लागवडी घालून काबाड कष्ट करून जपलेले पीक डोळ्यादेखत वाहून जाताना पाहून शेतकऱ्यांना गहिवरून आले होते. तर, शासनाने त्वरित पंचनामा करून भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.
सूर्यवंशी मळ्यातील अन्य 12 शेतकऱ्यांची भेंडी, टॉमॅटो यासारखी पिके पावसाने वाहून गेली आहेत. शिवाय, तालुक्यातही पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी शेतात शिरून मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील 400 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून ग्रामसेवक, तलाठी, कृषीसहायक अधिकारी यांच्यामार्फत सर्वेक्षण सुरू असून पंचनाम्याचे काम सुरू असल्याचे वाळवा तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने यांनी सांगितले.
हेही वाचा -पूल ओलांडण्याचा जीवघेणा प्रयत्न; ट्रॅक्टर पलटी, एकजण पुरात वाहून गेला