सांगली :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 जुलै रात्री 10 पासून ग्रामीण भाग वगळून सांगली जिल्हा लॉकडाऊन होणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा, उद्योग वगळता सर्व व्यवसाय, दुकाने बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. हा लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे.
सांगली महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनाचा वाढत प्रदूर्भाव पाहता तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 22 ते 30 जुलै पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. सांगली महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रापुरता लागू करण्यात आला आहे, तर इतर ग्रामीण भागात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार आणि काय बंद याचा अध्यादेश जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी जारी केला आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित प्रशासनाला आदेश देण्यात आल्याची माहितीही चौधरी यांनी दिली. त्याच बरोबर इतर जिल्ह्यातून महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश मिळणार नाही, त्याबाबत ई-पास न देण्याबाबत इतर जिल्हा प्रशासनाला सांगितल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. आज रात्री 10 वाजल्यापासून जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू होणार असून 30 जुलै रात्रीपर्यंत याची अंमलबजावणी होणार आहे.
काय असणार बंद..
लग्न, साखरपुडा, मुंज, वाढदिवस इत्यादी कार्यक्रम, सर्व सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, कृषी सेवा केंद्रे, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसोर्ट, मॉल, बाजार, मार्केट, वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारू दुकाने व सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग व ईव्हिनींग वॉक करणे, सर्व केश कर्तनालये, स्पा/ब्युटी पार्लर, सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजीपाला मार्केट, बेकरी, फेरीवाले, मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री, सर्व प्रकारचे खासगी बांधकाम, सर्व प्रकारची खासगी आस्थापना कार्यालये तसेच एसटी सेवा ही संपूर्ण जिल्ह्यात पूर्णपणे बंद राहील.
हे असणार सुरू..
दूध संकलन व त्या संबंधीत वाहतूक, किरकोळ दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण, एलपीजी गॅस घरपोच वितरण, सफाई विभाग, दुरध्वनी, इंटरनेट व बँक एटीएम, सर्व वैद्यकीय सेवा, पशू चिकित्सा सेवा, मेडिकल, बँक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सी (CRA) ची कामे व बँकिंग आणि आरबीआय मार्फत नियंत्रित होणाऱ्या इतर सेवा, न्यायालये व सर्व राज्य व केंद्र सरकारी कार्यालये, वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंट मिडिया यांची कार्यालये, वर्तमानपत्रे वितरण त्याच बरोबर पेट्रोल/डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील खाजगी व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा प्रसारमाध्यमे, यांच्यासाठी सुरू राहतील. शिवभोजन थाळी योजना त्याचबरोर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील उद्योगधंदे, मात्र कामगारांबाबत उद्योग केंद्राकडून पास घेणे बंधनकारक असणार आहे. अन्न, औषधी, वैद्यकीय उपकरणे, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह सर्व वस्तू आणि वस्तूंची ई-कॉमर्स वितरण सेवा, कुरिअर सेवा सुरू राहणार आहे.