सांगली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार भिंतीच्या आत लग्नाची गाठ बांधत एका नवदाम्पत्यांनी आपला संसार सुरू केला आहे. कुरळप येथे पाच लोकांच्या उपस्थितीत घरात हा सोहळा पार पडला. शासनाने पन्नास लोकांच्या उपस्थिती मध्ये लग्न सोहळा पार पडण्याची परवानगी दिली आहे. या नवदाम्पत्यांनी फक्त सहा लोकांच्या उपस्थितीत लग्न केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ना गाजावाजा, ना वरात, ना बँडबाजा फक्त सहा लोकांच्या उपस्थिती मध्ये विवाह संपन्न झाला.
लाखो रुपये खर्च करून केलेल्या लग्नात ही रुसवे फुगवे पाहायला मिळतात. कधी मुलीकडली मंडळी नाराज तर कधी मुलाकडील मंडळी नाराज होतात. सद्या कोरोनामुळे महागडी मंगल कार्यालये नाही की डॉल्बी सिस्टम नाही. फक्त पाच पंचवीस लोक उपस्थित असतात.
वाळवा तालुक्यातील कुरळप येथील तरुण पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच कंपनीत कोल्हापूरची एक तरुणीदेखील काम करायची. दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी 21मार्च रोजी रजिस्ट्रर लग्न केले. ही माहिती घरच्यांना समजली आणि दोघांच्या घरच्यांची समजूत काढणे सुरू झाले. त्यानंतर सर्वांच्या संमतीने पुन्हा लग्न लावण्याचे ठरले. याच दरम्यान लॉकडाऊन लागले.
ना बँड ना बाजा.. चार भिंतीच्या आत वधु-वराने बांधली लग्नगाठ, सांगलीतील घटना 23 मार्चला नवरा मुलगा कुरळप येथील त्याच्या घरी गेला. मुलीला शिराळा तालुक्यातील पाहुण्याच्या घरी ठेवण्यात आले. शासनाने 4 तारखेला शासनाने शिथिलता दिली आणि नवरदेवाच्या घरातील मंडळींनी मुलीच्या आई वडिलांशी फोनवरून संपर्क साधून लग्नाविषयी चर्चा केली. जिल्हा बंदी असल्याने मुलीचे आई-वडील कोल्हापूरहून येऊ शकत नव्हते.
दरम्यान, मुलीला सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातून मुलाच्या घरी आणले. घरातील आई वडील, भाऊ-वाहिनी, भटजी व एक शेजारी अशा पाच-सहा लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्यात आले. दुसऱ्या दिवशी या नवदाम्पत्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करवून घेतली.