सांगली- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आजपासून पुन्हा लॉकडाऊन सुरू झाला आहे. बुधवारी रात्रीपासूनच याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी लॉकडाऊनला नागरिकांनी चागंला प्रतिसाद दिला आहे. ग्रामीण भाग वगळून पालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात हा लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत असणार आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सांगलीत पुन्हा लॉकडाऊन...
सांगली महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्णांची संख्या समोर येत आहे. त्यामुळे चार दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हा प्रशासनाने जिल्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला.
सांगली महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात हा लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. तर इतर ग्रामीण भागात मात्र नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर आठ दिवस असणाऱ्या या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा, उद्योग वगळता इतर सर्व व्यवहार, दुकाने, एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच केवळ अत्यावश्यक कारणांमुळेच नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे.
लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी याआधीच दिलेला आहे. सांगली महापालिकेसह लॉकडाऊन असणाऱ्या क्षेत्रात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात झाला आहे. महापालिका क्षेत्रातही पालिका प्रशासनाने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केलेली आहेत. या 23 पथकांच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.