सांगली -एका 5 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला ( Leopard attack child Sangli ) करत गंभीर जखमी केले आहे. हल्ल्यानंतर बिबट्याने मुलाला ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र मजूरांना पाठलाग केल्याने मुलाचे जीव वाचले आहेत. शिराळा तालुक्यातील तडवळे येथे हा थरार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याची बालकावर झडप -
शिराळा तालुक्यातील तडवळे येथे ऊस मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एका ऊस तोडणी मजुराच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.गणेश श्रीराम कांबिलकर,वय 5, रा.मानकूरवाडी, जिल्हा बीड असे जखमी बालकाचे नाव आहे. तडवळे गावातील शिवाजी पाटील यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना ऊसात लपून बसलेल्या बिबट्याने त्याठिकाणी खेळणाऱ्या पाच वर्षीय गणेशवर झडप घातली. जबड्यात पकडून गणेशाला बिबट्या पळू लागला. बिबट्याच्या हल्ल्याने गणेश हा भेदरून गेला होता. तर त्याला घेऊन पळणाऱ्या बिबट्याला तेथील ऊस तोडणी करणाऱ्या महिलेला बिबट्या मुलाला घेऊन पळत असल्याचे निदर्शने येताच, महिलेने आरडा-ओरडा सुरू केला. त्यानंतर मजुरांनी बिबट्याचा पाठलाग सुरू केला. तर अडथळ्याचा मार्ग असल्याने बिबट्याला मुलाला पळवुन नेणे शक्य झाले नाही. त्यामुळे बिबट्याने गणेशाला काही अंतरावर टाकून धूम ठोकली. तर जखमी गणेशला तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.