सांगली- सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर करुन जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एका वकिलाला पोलिसांनी अटक केली आहे. आनंद देशपांडे असे त्या वकिलाचे नाव आहे.
आनंद देशपांडे इस्लामपूरमध्ये वकिली करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी वकिलांच्या व्हाट्सअॅपच्या ग्रुपवर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केले होते. तेव्हा इस्लामपूर पोलिसांनी देशपांडे यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि सोमवारी देशपांडे यांना अटक केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची अफवा किंवा जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज पोस्ट करू नयेत किंवा व्हायरल करू नयेत, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील शर्मा यांनी दिला आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबरकडून प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये सुमारे १३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी ७९ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी २४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत.
हेही वाचा -सांगली : वाळवा-शिराळा तालुक्यात गारांसह पाऊस, वीज कोसळल्याने नुकसान
हेही वाचा -सांगली कोरोनामुक्तीच्या दिशेने.. २४ जणांचे अहवाल निगेटिव्ह, ६ अहवाल बाकी