सांगली- इस्लामपूर मधील पहिल्या चार कोरोनामुक्त झालेल्यापैकी एका ६२ वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी त्या महिलेला घरी सोडण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी पहाटे सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.
इस्लामपूरच्या कोरोनामुक्त झालेल्या वृद्ध महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू - Coronafree
कोरोनामुक्त झालेल्या महिलेच्या छातीत दुखू लागल्याने गुरुवारी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये सौदी अरेबियामधून परतलेल्या चौघांना कोरोनाची लागन झाली होती. जिल्ह्यातील हे पहिलेच चार रुग्ण होते. ज्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील २२ जणांना कोरोना लागण झाली होती. उपचार केल्यानंतर हे सर्वच्या सर्व जण हे कोरोनामुक्त झाले होते. त्यापैकी पहिल्या चार जणांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन संस्थात्मक क्वारंटाइन मध्ये दाखल केले होते. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याने व कोणतेही कोरोना लक्षणे आढळून न आल्याने त्यांना १० दिवसांपूर्वी त्यांच्या घरी सोडण्यात आले होते .
६२ वर्षीय महिलेला गुरुवारी छातीत दुखू लागल्याने तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी उपचार सुरू असताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती इस्लामपूरचे प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे.