वाळवा (सांगली) -तालुक्यातील येलूर फाट्यावर आज (दि. 28 ऑक्टोबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास मालवाहू जीपमधून (क्र. एमएच 09 एफ एल 1359) पोलिसांनी 9 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुटखा व जीप असा एकूण 15 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चालक व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गावर येलूर फाट्यावर पोलिसांनी एक मालवाहू जीप अडवली. चालकाजवळ विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर जीपची तपासणी केली असता जीपच्या मागील हौद्यामध्ये समोरच्या बाजूस जनावरांसाठीच्या भुशाची पोती व त्या मागे गुटखा मिळून आला. याबाबत चालक सुरेश गंगाधर मतवाडे (रा. रेंदाळ, जि. कोल्हापूर) याच्याकडे चौकशी केली असता निपाणीहून सातारा येथील व्यापाऱ्याला देण्यासाठी नेत असल्याचे चालकाने सांगितले.