महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृष्णा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; पालिकेचे दुर्लक्ष

शहरातील सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याने ती प्रदूषित होत आहे. सांगली शहारात जवळपास ३८ एमएलडी इतके सांडपाणी निर्माण होते. या पाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सांगली पालिका प्रशासनाची आहे. मात्र, पालिकेकडून यावर ठोस उपाययोजना केल्या जात नाही.

sangli
कृष्णा नदीचे दृश्य

By

Published : Dec 3, 2019, 10:26 AM IST

सांगली- स्वच्छ, निर्मळ समजली जाणारी सांगलीची कृष्णा नदी आता गटारगंगा झाली आहे. शहर महापालिकेचे नियोजनशून्य कारभार आणि प्रदूषण महामंडळाच्या अनास्थेमुळे शहरातले लाखो लिटर सांडपाणी दररोज नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे कृष्णा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.

कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबत माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

स्वच्छ समजली जाणारी कृष्णा नदी ही २२३ किलोमीटरचे अंतर कापून सांगली शहरात पोहोचते. मात्र, शहरातील सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याने ती प्रदूषित होत आहे. शहारात जवळपास ३८ एमएलडी इतके सांडपाणी निर्माण होते. या पाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सांगली पालिका प्रशासनाची आहे. मात्र, पालिकेकडून यावर ठोस उपाययोजना केल्या जात नाही. परिणामी, शहरातील सांडपाणी प्रक्रिया न होता थेट कृष्णा नदीच्या पात्रात मिसळत आहे.

शहरातील प्रसिद्ध अशा शेरी नाल्याच्या माध्यमातून हे सर्व सांडपाणी कृष्णा नदीत पोहोचते. शेरी नाल्याच्या भोवती सांगलीचे राजकारण राहिले आहे. इतकेच नव्हे तर, शेरी नाला हा निवडणुकीचा केंद्रबिंदू देखील राहिला आहे. युतीच्या काळात या नाल्याच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी धूळगाव योजना आखण्यात आली. याद्वारे नाल्याचे सांडपाणी उचलून ते स्वच्छ करून शेतीला देणे अपेक्षित होते. मात्र, ही योजना अनेक वर्षे रखडलेली. त्यानंतर ती पुन्हा उदयास आली. मात्र, निधी आणि तांत्रिक गोष्टींच्या अभावी ती बंद पडली. नुकत्याच आलेल्या महापुरात या योजनेला मोठे नुकसान झाले. आणि त्यानंतर ही योजना ठप्प पडली.

परिणामी, गेल्या काही महिन्यांपासून शेरी नाल्यातून शहरातील सांडपाणी कृष्णानदी पात्रात थेट मिसळत आहे. तसेच नदीकाठच्या शहरातील इतर काही भागातून पोहचणारे पाणीसुद्धा नदी पात्रात मिसळत आहे. कृष्णा नदीच्या वारंवार होणाऱ्या प्रदूषणावर अनेक वेळा सामाजिक संघटनांनी आवाज उठवला, आंदोलने केली. याची थोडीफार दखल सांगलीत अस्तित्वात असणाऱ्या प्रदूषण महामंडळाने घेतली. मात्र, पालिकेवर या प्रदूषण महामंडळाकडून केवळ थातूर-मातूर कारवाई करण्यात आली. कधी दंडात्मक कारवाई तर कधी नोटिसा बजावण्यात आल्या. सांडपाण्याच्या उपाययोजनेसाठी पालिका प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचविण्याचा उद्योग करण्यात आला. मात्र, ठोस पावले न उचलल्याने कृष्णाचे पात्र प्रदूषितच राहिले. मात्र, आता नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर होत चालल्यामुळे पालिका प्रशासनाने वेळीच या मुद्द्याकडे लक्ष देऊन कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

हेही वाचा-जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीत एच.आय.व्ही जनजागृती प्रभात फेरी

ABOUT THE AUTHOR

...view details