सांगली -क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाबाई पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या 96 वर्षांच्या होत्या. कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योती मालावली.
हेही वाचा -...म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
हौसाबाई पाटील यांनी स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासोबत भूमिगत कारवायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. इंग्रजांच्याबद्दल माहिती गोळा करून त्या भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होत्या. इंगज सैनिकांची नजर चुकवून पत्री सरकारमधल्या भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांच्या जेवणाच्या व्यवस्थेपासून त्यांना शस्त्र पुरवण्याचे कामही हौसाबाई पाटील करत होत्या
- पत्री सरकारचा जिवंत इतिहास काळाआड -
वयाच्या 20 व्या वर्षी हौसाबाई पाटील यांनी महिलांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळीमध्ये सामील होण्यासाठी प्रेरीत करून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या लढ्याला बळ देण्याचं काम केलं होतं. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या त्या एकुलत्या एक मुलगी होत्या. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जिवंत इतिहास काळाच्या पडद्याआड गेला आहे. हौसाबाई पाटील यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे आणि परतवंडे असा परिवार आहे.
हेही वाचा -मुंबई शेअर बाजारात 958 अंशांची उसळी; नोंदविला आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक