सांगली - कोयना धरणातून 19 हजार 226 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, कृष्णा व वारणा नद्यांची पूरस्थिती कायम आहे. चांदोली धरणातूनही 13 हजार क्युसेक पाणी सोडल्याने जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे.
शिराळा तालुक्यात पावसाची संततधार कायम असल्याने वारणा नदीला पूर आला आहे. तसेच चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आठ दिवसांपासून अतिवृष्टी कायम असल्याने हे धरण भरले असून, 34.40 टी.एम.सी. पैकी 32.33 टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे.
सततच्या पावसाने वारणा नदीकाठचे जवळपास हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. त्याचसोबत शिराळा आणि वाळवा तालुक्यातील वारणा नदीवरील पाच छोटे बंधारे,तीन पूल पाण्याखाली आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याजवळील काही गावांचा संपर्क तुटला आहे.
कोयना धरणातून 19 हजार 226 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कृष्णा नदीतील वाळवा तालुक्यातील बहे-बोरगाव व पलूस तालुक्यातील आमणापूर येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 37.06 फुटांवर पोहोचली आहे. यामुळे सांगली शहरातील नदीकाठच्या सखल भागातील दत्तनगर, सूर्यवंशी प्लॉट या ठिकाणी पुराचे पाणी घुसले आहे. दोन दिवसांपासून या ठिकाणच्या अनेक घरांना पुराचा फटका बसला असून, महानगरपालिका प्रशासनाने स्थानिक नागरिकांचे पालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतर केले आहे. पालिका प्रशासनाने संबंधित ठिकाणी पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन पथके कार्यान्वित केली आहेत.
कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाची संततधार कायम असल्याने पूर पातळीत आणखी वाढ होणार आहे. सांगली शहरात पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास सोमवारी (दि. ५ जुलै) रोजी कृष्णेची पाणीपातळी दीड ते दोन फूट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.