सांगली- शहरातील काही सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणांनी होम क्वारंटाईन व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी 'कोविड 19 फायटर सांगली' अॅप बनवले आहे. या अॅपच्या माध्यमातून होम क्वारंटाईन व्यक्तींवर नजर ठेवता येणार आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून निर्मिती केलेले हे अॅप सांगली प्रशासनाकडे सुपूर्द केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम क्वारंटाईन केलेले असताना अनेक व्यक्ती बाहेर फिरताना आढळतात. तसेच या व्यक्तींमुळे अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे होम क्वारंटाईनबाबत प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. मात्र, तरीही होम क्वारंटाईन व्यक्तींवर नजर ठेवणे कठीण आहे. त्यामुळे सांगलीतल्या काही सॉफ्टवेअर इंजिनीयर तरुणांनी यावर मार्ग शोधला आहे.
खासदार संजयकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांसाठी जिओट्रॅकिंग आणि जिओफेंसिंग यंत्रणा वापरून कोविड- 19 फायटर सांगली हे अॅप्लिकेशन विकसित केले आहे. दिपक इंगवले व त्याच्या मित्रांनी मिळून हे अॅप बनवले आहे.
- कोविड- 19 फायटर सांगली अॅप कसे काम करते?
स्मार्ट फोन व अँड्रॉइड बेस मोबाईल बेस अॅप प्रत्येक होम क्वारंटाईन व्यक्तींच्या 10 मिनिटांच्या हालचालीची नोंद ठेवते. तसेच एक तासाचा रिमाईंडिंग सेटिंग, सेल्फ फेसिंग अटेंडन्स, घराच्या भागानुसार अंतरची सीमा, सीमा ओलांडल्यास तातडीने पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला अलर्ट ही सुविधा या अॅपमध्ये आहे. तसेच होम क्वारंटाईन व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास आरोग्य यंत्रणेला समजेल, अशी यंत्रणा या अॅपमध्ये आहे.