सांगली - फेसबुक लाईव्ह करून सापाला मारणे एकाचा चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी सांगलीच्या पिपल फॉर अनिमल्सचे सल्लागार बसवराज होसगौडर यांच्या तक्रारीवरून पुणे वन विभागाने कबीर वाघमारे याच्या विरुद्ध वन्यजीव कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.
साप मारणे पडले महागात...!
"मी मारलाय हा साप ,आता जस्ट", अशी टॅगलाइन देऊन कबीर वाघमारे याने इतरांच्या मदतीने काठीने घोणस जातीचा साप अतिशय क्रूरतेने मारून त्याचा व्हिडिओ फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला होता. त्यानंतर ही पोस्ट वाऱ्यासारखी सोशल मीडियावर व्हायरल झाली.
याची माहिती सांगलीतील प्राणीमित्र बसवराज होसगौडर यांना मिळताच याबाबत चौकशी करून त्यांनी कबीर वाघमारेविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत, पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या आदेशानुसार कबीर वाघमारेच्या विरुद्ध वन्यजीव गुन्ह्याची नोंद केली आहे. सदर घटना कुठे घडली आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही.
मात्र आरोपीचा शोध सुरु असून लवकरात लवकर अटक करून कारवाई केली जाईल, असे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी स्पष्ट केल्याचे बसवराज होसगौडर यांनी सांगितले.
हेही वाचा - 'पठाण ब्रदर्स'चा फोटो तुफान व्हायरल, इरफानने दिले खास कॅप्शन