सांगली -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज ( ५ मे) जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी दुष्काळी स्थितीबाबत जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचे ते म्हणाले. तसेच, सरकारने शेतकरी आणि पशुधन वाचवण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला.
दुष्काळाबाबत जिल्हा प्रशासन गंभीर नाही, जयंत पाटलांचा आरोप - drought
दुष्काळाबाबत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यांनी आज थेट आपल्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेटी दिल्या आहेत.
दुष्काळाबाबत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यांनी आज थेट आपल्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेटी दिल्या आहेत. खानापूर तालुक्यातील गावांमधील पाण्या अभावी वाया गेलेल्या शेतात जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली. तसेच आटपाडी नजीक सुरू झालेल्या चारा छावण्यांनाही भेटी दिल्या.
यावेळी शेतकऱ्यांनी पाटील यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला. यावेळी जयंत पाटील यांनी छावण्यांच्या सरकारी निकषांवर टीका केली. आज सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परस्थिती आहे. पाणी आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून आटपाडी तालुक्यात गेल्या महिन्यात दोन छावण्या सुरू केल्या, मात्र जत तालुक्यात अद्याप एकही छावणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळाकडे गंभीरपणे लक्ष देण्यात येत नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच सरकारने यामध्ये तातडीने पुढाकार घेऊन चारा छावण्यांच्या निकषामध्ये बदल करावेत आणि शेतकरी व पशुधन वाचवावे, अशी मागणी यावेळी केली.