सांगली - जिल्ह्यातील सिंचन योजनांचे पाणी शेतकऱ्यांच्या दारात देण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण केली जाईल. दुष्काळी जतच्या उर्वरित भागाला पाणी देण्यासाठी आणखी एक म्हैसाळ सिंचन योजना चालू करावी लागली, तरी चालेल, असे मत जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले. ते सांगलीमध्ये आयोजित सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळया प्रसंगी बोलत होते.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी निवड झाली आहे. या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस शिवसेना,राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यासह विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्यावतीने जयंत पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. या सत्काराला उत्तर देताना मंत्री जयंतराव पाटील यांनी सांगली जिल्ह्यातल्या टेंभू-ताकारी-म्हैसाळ सिंचन योजनेच्या माध्यमातून अजूनही शेतकऱ्या पर्यंत पोहोचले नसल्याचे शेतकरी सांगतात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पाणी देण्याची शाश्वत व्यवस्था झपाट्याने निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे.
दुष्काळी जतच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या पर्यंत पाणी पोहोचलेले नाही, त्यामुळे आणखी एक म्हैसाळ सिंचन योजना सुरू करावी लागली तरी चालेल, पण तिथल्या शेतकऱ्यांच्या दारात पाणी पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहील, असे मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केले. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या सत्तेत जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नेहमीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्याकडे राहिले, त्यांनी सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला नेहमीच बरोबर घेऊन योगदान दिला. मात्र, गेल्या पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासाला गती मिळू शकली नाही. मात्र, आता यापुढे सांगली शहरातील रखडलेल्या विविध योजना, जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन विकाला गती देण्याचे काम केले जाईल. आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असून केवळ एक पक्षाचा नसून सर्व पक्षाचे आहोत, त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन जिल्ह्याच्या विकासासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन ही यावेळी मंत्री जयंतराव पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांना यापुढे जात पडताळणी दाखले सरकारच्या माध्यमातून शाळेतच उपलब्ध करून देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर वाळवा तालुक्यात उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यानंतर संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जाईल, असे मत त्यांनी स्पष्ट केले.