सांगली : यंदा पूर परस्थितीची शक्यता नाही, मात्र तरीही प्रशासन सज्ज - जयंत पाटील
यंदा पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, मात्र तरीही प्रशासन सज्ज आहे. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता सर्व तयारी करण्यात आली असल्याचा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सांगली - यंदा पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, मात्र तरीही प्रशासन सज्ज आहे. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता सर्व तयारी करण्यात आली असल्याचा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच पाण्याच्या नियोजनाबाबत कर्नाटक राज्याशी बोलणी सुरू करण्यात येणार असून, वडनरे समिती अहवालावर पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सांगली जिल्ह्यात गतवर्षी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यंदा "पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही" मात्र तरीही प्रशासन सज्ज झालेले आहे. गतवर्षी आलेला महापूर लक्षात घेता राज्य सरकारकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. प्रशासन पातळीवर योग्य त्या नियोजनाबाबत सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील पाण्याच्या नियोजनाबाबत कर्नाटक राज्याशीही बोलणी सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याच्या बाबतीतही नियोजन आणि त्यादृष्टीने बोलणी सुरू करण्यात येणार असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.