सांगली - 2019 च्या तुलनेत यंदा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला. मात्र सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. हळू-हळू हा पूर येत्या काही तासात ओसरायला सुरुवात होईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच जिल्ह्यातील पूर ओसरल्यावर तातडीने पुर नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटलांनी पूर स्थितीची केली पाहणी..
सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला आहे. या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यात आणि सांगली शहरामधील पूर स्थितीची राज्याचे जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली आहे. त्यानंतर रात्री उशिरा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री पाटील यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.
हेही वाचा-महापुराच्या धास्तीत असलेल्या सांगलीकरांना दिलासा..! पाणी ओसरायला सुरुवात
2019 च्या तुलनेत प्रचंड पाऊस..
2019 च्या महापुराच्या तुलनेत सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या नदी आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाला आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. दुसऱ्या बाजूला धरणातून नियंत्रण ठेवून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पूर स्थिती पाहता पंचगंगा नदीचा विसर्ग करण्यावर लक्ष आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा नदीच्या पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीने अलमट्टीकडे सुरू असल्याचे जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा-सांगली : कृष्णेचे पाणी शिरले बाजारपेठेत; तर वारणा, कृष्णाकाठची शेकडो गावे पुराच्या विळख्यात