सांगली- कोरोनाचे संकट असताना पुराचे संकट येवू नये, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. हवामान खात्याकडून माहिती घेवून पावसाचा अंदाज बघा. दोन्हींचा ताळमेळ घालूनच धरणातील पाणी सोडा, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी व जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पावसाळ्यात पूर परिस्थिती गंभीर होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चांदोली धरणाला भेट देऊन पाहणी केली . यावेळी आमदार मानसिंगराव नाईक उपस्थित होते. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक किती आहे, याची जयंत पाटील यांनी माहिती घेतली. सध्या झालेला पाऊस व गतवर्षाच्या पावसाची माहिती घेऊन तुलनात्मक अभ्यास करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला दिली. पावसाळाच्या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाने सतर्क राहावे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी धरणाची पाणी साठवण क्षमता व होणारा पाऊस याची माहिती घेतली.