सांगली- राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आमदार घणाघाती टीका केली आहे. एका महिलेच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवणे, हा काय पुरुषार्थ आहे का ? आयत्या बिळावर नागोबा झालेल्या चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांची मापे काढणे बंद करावे, असा इशाराही जयंत पाटलांनी दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. या टीकेचा जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला.
शरद पवारांवर केलेल्या टीकेवर जयंत पाटलांचा घणाघात पवारांनी मला शिकवू नये -
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुण्यात चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला होता. 'ज्यांना आपले गाव सोडून दुसरीकडे जावे लागते, त्यांच्या बद्दल मी काय भाष्य करू' असे त्यांनी म्हटले होते. यावर चंद्रकांत पाटलांनी जोरदार पलटवार केला आहे. पवारांना माढा लाढावे लागले, पण जिंकणार नाही असे समजताच, माढा सोडावे लागले. त्यामुळे पवारांनी मला शिकवू नये, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर तोफ डागली होती.
चंद्रकांतदादा हा कसला पुरुषार्थ ?
चंद्रकांत पाटील यांना आता चिंता पडली आहे की आपला पक्ष कसा टिकवायचा त्यामुळे ते वारेमाप बोलत आहेत. तसेच पुण्यातील एका महिलेने चांगले काम करून तयार केलेल्या मतदार संघात ताबा घेऊन तिथून निवडणूक लढवली, हा काय पुरुषार्थ आहे? असा सवाल जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना केला आहे. तसेच पक्षातील महिला असणाऱ्या मेधा कुलकर्णी यांना बाजूला ढकलून आपल्या अधिकाराचा वापर करत निवडणूक लढवली. स्वतःच्या मतदार संघ आणि जिल्हा सोडून दुसऱ्या महिलेच्या मतदारसंघात जावे लागते आणि महिलेच्या जीवावर भाजपाने लोकप्रियता मिळवली. "आयत्या बिळावर नागोबा" अशी चंद्रकांत पाटलांची वर्तणूक राहिली असल्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांची मापे काढणे बंद करावेत. आपण विरोधी पक्षात आहो, जे काही असेल ते रीतसर बोलायला आमची हरकत नाही, असा इशाराही जयंत पाटलांनी दिला आहे.
सत्तेसाठी भाजपा खालच्या थराला
गोपीचंद पडळकर यांच्याकडून होणाऱ्या टीकेवर बोलताना पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्यात आज भाजपा कोणत्या थराला गेली आहे ते कळत आहे. सत्ता गेल्यानंतर भाजपाची मानसिक स्थिती कशी आहे हे त्यांच्या नेत्यांच्या विधानावरून जनतेला कळत आहे. तसेच कोणाची योग्यता किती ते सगळ्यांनाच माहीत आहे. पण आज सत्ता मिळवण्यासाठी भाजपा खालच्या थराला जाऊन काहीही बोलत आहेआणि त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही,असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला आहे.