सहकारी गमाविल्याने जयंत पाटील यांना अश्रु अनावर, म्हणाले...
अत्यंत शात आणि संयमी अशी प्रतिमा असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सहकाऱ्याच्या निधनाने भावूक झाले. त्यांनी सहकारी गमावित असताना दु:ख व्यक्त केले.
सांगली- राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूरच्या कमेरी येथे आपल्या सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जनावेळी भावूक होताना पाहायला मिळाले. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अकाली निधनामुळे जयंत पाटील यांना श्रद्धांजली वाहताना त्यांना गहिवरून आले.
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक असणारे जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. रविवारी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कामेरी येथे त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री जयंत पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी आपले सहकारी जगदीश पाटील यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कार्याविषयी बोलत असताना अचानक जयंत पाटील यांना गहिवरून आले. जयंत पाटलांच्या डोळ्यात साठलेल्या अश्रूंचा बांध फुटला. काही काळासाठी जयंत पाटील स्तब्ध झाले. त्यांनतर स्वतःला सावरत जयंत पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, की लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक लोक मला लाभले. या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलो आहे. मात्र तीच लोक आज माझ्या हातून निसटत आहेत, याचे दुःख होत आहे,अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.