सांगली - ऐन पावसाळ्यात सांगलीच्या जत तालुक्यात पाण्याची टंचाई कायम आहे. तालुक्यातील अनेक भाग आज कोरडे आहेत. पूर्व भागात पाणीटंचाईची तीव्रता नेहमी प्रमाणे आहे, मात्र यंदा कोरोना संकटामुळे दुष्काळी स्थिती झाकोळली गेली आहे.
ऐन पावसाळ्यातही जत तालुक्यात पाण्याची टंचाई कायम... सांगली जिल्ह्यातला दुष्काळी तालुका म्हणून जतची ओळख आहे. विस्ताराने मोठा असलेल्या या तालुक्यातील जनतेला वर्षानुवर्षे पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. जत तालुक्यामध्ये म्हैसाळ सिंचन योजनेच्या माध्यमातून थोड्या-फार प्रमाणात पाणी पोहोचले आहे. मात्र, अजूनही या तालुक्यातील पूर्व भाग पाण्यापासून वंचित आहे. पाण्यासाठी येथील गावांनी अनेकवेळा आंदोलने केली. इतकेच नव्हे तर, जत ते मुंबईपर्यंत पायी यात्रा सुद्धा काढली. अगदी कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा सुद्धा दिला होता. त्यानंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे या दुष्काळग्रस्त जनतेची मनधरणी करण्यासाठी थेट जतमध्येही पोहोचले होते. पण, आजही ही जत तालुक्यातील स्थिती फारशी बदलेली नाही. आजही जतच्या पूर्व भागात दुष्काळी स्थिती कायम आहे. पिण्याच्या पाण्यापासून शेती आणि जनावराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
हेही वाचा -नातेच नव्हे तर माणुसकीही लाजली; आजीच्या मृतदेहापेक्षा नातवाला होती दागिन्यांची चिंता
जत तालुक्याला लागून कर्नाटक राज्याची सीमा आहे. मात्र, त्याठिकाणी दुष्काळ नाही, उलट कर्नाटकच्या महाराष्ट्र सीमेवरील गावात पाण्याचा सुकाळ आहे. तुबची-बबलेश्वर या कर्नाटक राज्यातील योजनेचे पाणी आज थोड्याफार प्रमाणात जतच्या दुष्काळग्रस्तांची तहान भागविण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र, राज्य सरकारच्या समन्वयाअभावी ते शक्य होत नाही, जतचे आमदार विक्रम सावंत यांनी व्यक्तिगत पातळीवर या योजनेचे पाणी तालुक्याला मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हे पाणी आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची योजना नव्याने करण्याची गरज नसून केवळ कर्नाटकाकडे महाराष्ट्रातून जाणारे अतिरिक्त 6 टीएमसी पाण्यापैकी 2 टीएमसी पाणी कर्नाटक सरकारकडून तुबची-बबलेश्वर योजनेतून अगदी 1 रुपया खर्च न करता मिळू शकते. त्यामुळे तालुक्यातील पूर्व भागातील पाण्याची पाण्याची टंचाई मिटू शकते, असा विश्वास काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यातील संख, तिकोंडी असे तलाव आज कोरडे आहेत. त्यामुळे पाण्याची स्थिती गंभीर आहे. मात्र, शासन केवळ कोरोनाकडे लक्ष देत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर शासनाने तालुक्यातील टॅंकर बंद केली आहेत. पण, पाण्याची स्थिती ऐन पावसाळ्यातही गंभीर असून कोरोनापेक्षा पाण्याची स्थिती तालुक्याच्या पूर्व भागात भीषण आहे. त्यामुळे सरकारने कोरोनाबरोबर इकडेही लक्ष द्यायला हवे, अशी मागणी येथील दुष्काळग्रस्त करत आहेत.
हेही वाचा -गुंड मिणच्या गवळी खून प्रकरणी एकास चार वर्षांची शिक्षा,तर चौघांची निर्दोष मुक्तता..
गेल्या दहा दिवसात जत तालुक्यात पाऊस पडला आहे. पण पडलेला पाऊस तहानलेल्या जतच्या घश्याची कोरड दूर करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील पाश्चिम भागात पाऊस आणि म्हैसाळ सिंचन योजनेमुळे थोडा दिलासा मिळाला आहे. पण, पूर्व भागातील दुष्काळाची स्थिती कायम आहे. ही स्थिती यंदा कोरोनामुळे तीव्रतेने पुढे येऊ शकली नाही, त्यामुळे यंदा कोरोनाच्या संकटात जतचा दुष्काळही सापडला आहे, असेच म्हणावे लागेल.