सांगली - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना गाडीवरून घेऊन फिरवणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकला चांगलेच महागात पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमु एडके यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हक्कलपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर आमदार पडळकर यांनी विचित्र शब्दांमध्ये टीका केली होती आली होती.
संपूर्ण राज्यभर आमदार पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली होती. आमदार पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करत निषेध नोंदवण्यात येत होता. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातल्या जत नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक लक्ष्मण ऊर्फ टीमु एडके यांनी मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वागत करत त्यांना आपल्या दुचाकीवरून शहरभर फिरवल्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर करण्यात आलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीमध्ये आमदार पडळकर यांच्या विरोधात संताप व्यक्त होत असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आमदार पडळकर यांचे एक प्रकारे समर्थन केल्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात उलट- सुलट चर्चेला उधाण आले होते.