सांगली - इस्लामपूर नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिभा शिंदे यांच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शिंदे गटामध्ये सामील होत नसल्याने ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप प्रतिभा शिंदे आणि त्यांचे पती शिवकुमार शिंदे यांनी केला आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला ( shivsena corporator husband beaten in sangli )आहे.
हात आणि पाय फ्रॅक्चर - इस्लामपूर नगर पालिकेच्या शिवसेनेत नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार शिंदे यांना सोमवारी ( 25 जुलै ) सकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडल्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जबर मारहाण केली आहे. त्या मारहाणीमध्ये शिवकुमार शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत शिंदे यांचे हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांना सांगलीच्या भारती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, हा हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असणाऱ्या स्थानिक गटाकडून करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिभा शिंदे व त्यांचे जखमी पती शिवकुमार शिंदे यांनी केला आहे.