इस्लामपूर (सांगली)-गेले वर्षभर शहरात आपल्या कामाची वेगळी छाप पाडून आणि सातत्याने चर्चेत राहिलेल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार यांच्या बदलीचा आदेश बुधवारी प्राप्त झाला. मंगळवारी रात्री उशिरा हे आदेश नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. पवार यांच्या बदलीची चर्चा गेले आठवडाभर शहरात जोरदार चर्चा सुरु होती. मुख्याधिकारी पवार यांची पुणे महानगरपालिकेमध्ये सहायक आयुक्तपदी बढती झाली आहे. इस्लामपूर पालिकेसाठी पालघर नगरपालिकेत मुख्याधिकारी असलेले अरविंद माळी यांची वर्णी लागली आहे.
गतवर्षी जुलै महिन्यात मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची बदली होऊन प्रज्ञा पवार याठिकाणी रुजू झाल्या. इस्लामपूर पालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला मुख्याधिकारी म्हणून त्यांची नोंद झाली. त्या आल्या तेव्हा भाजपची सत्ता होती. पालिकेतही भाजप समर्थक विकास आघाडी सत्तेत असल्याने भाजप नेत्यांनी त्यांना खास प्रयत्न करून आणल्याची चर्चा होती. अगदी सुरुवातीच्या काळातच त्यांनी अद्याप कामकाजाला सुरुवात केली. त्याच दरम्यान लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या. त्यामध्ये राज्यात सत्ताबदल होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत आली.