सांगली - इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात सेनेला भाजपच्या बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. गुरुवारी युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे गौरव नायकवडी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपचे इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे शिवसेनेसमोर भाजपच्या बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे.
गौरव नायकवडी आणि निशिकांत पाटील यांनी इस्लामपूर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला सांगलीच्या इस्लामपूर मतदारसंघात विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यासमोर उमेदवार कोण ? असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर, या ठिकाणी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन एकच उमेदवार देण्याचा निर्धार केला होता.
हेही वाचा... भाजपचा एकनाथ खडसेंना ठेंगा, मात्र मुलगी रोहिणी खडसेला मिळणार उमेदवारी..?
शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. या ठिकाणी ऐनवेळी शिवसेनेत दाखल झालेले क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच आव्हान देण्यात येत आहे.
हेही वाचा... विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरेंची संपत्ती माहीत आहे का?
इस्लामपूरचे भाजप नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडे त्यांनी इस्लामपूर मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र, ही जागा सेनेला गेल्याने त्यांच्यासमोर अडचण उभी राहिली. पण, निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा दबाव यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्धार केला असल्याचे, त्यांनी सांगितले. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने आव्हान निर्माण करण्याऐवजी युतीमध्ये भाजप-सेना एकमेकांसमोर उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, उमेदवारी माघारी घेतल्यानंतर मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा... अब्दुल सत्तारांसाठी भाजपने सोडला हक्काचा मतदारसंघ !